पनवेलमधील वन विभागाच्या अधिकाऱ्यांची नवी मुंबईत कारवाई
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : पनवेल येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईत येऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा दावा समोर आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाशी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पासाठी झाडे तोडणे किंवा स्थलांतर करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या झाडांवर पक्ष्यांची घरटी असल्याने पर्यावरणप्रेमी सत्यवान गायकवाड यांनी यास हरकत घेतली होती. संबंधित विकसकाने पनवेल येथील वन अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत अल्पावधीतच दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन अहवाल तयार केल्याचे समोर आले आहे. मात्र, या अहवालाबाबत तपशीलवार माहिती मागितल्यानंतर वन विभागाकडून गेल्या दीड महिन्यापासून टाळाटाळ केली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन वन्यजीवसंदर्भात अहवाल कसा दिला आणि अहवाल दिला असल्यास त्याची माहिती का दडवली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
वनमंत्र्यांकडे तक्रार करणार!
पनवेल येथील वन अधिकाऱ्यांनी वाशी येथे येऊन जी कार्यवाही केली, त्याबाबत आम्ही नियमानुसार माहिती मागितली आहे. मात्र, मागील दीड महिन्यापासून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आम्ही आता जनता दरबारात वनमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणार आहोत, असे सत्यवान गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

