नऊ दिवसांत २० कोटींची वसुली!

नऊ दिवसांत २० कोटींची वसुली!

Published on

वाशी, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘अभय योजने’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या नऊ दिवसांत तब्बल पाच हजार ७४४ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत २० कोटी १५ लाखांची रक्कम जमा झाली आहे.

महापालिकेकडून १० मार्चला ही योजना सुरू करण्यात आली असून, ३१ मार्चपर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास विलंब शुल्कावर ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घेत कर भरण्यास प्राधान्य दिले आहे. १० मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १८ मार्च दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कर संकलन झाले आहे. सध्या महापालिकेच्या एकूण मालमत्ता कर संकलनाची रक्कम सुमारे ६७५ कोटींवर पोहोचली असून, करवसुली मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

अद्याप काही मालमत्ताधारकांकडून थकीत कर भरलेला नसून, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत कर एकरकमी भरून ५० टक्के विलंब शुल्क सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

ऑनलाइन कर भरण्याकडे वाढता कल
नवी मुंबईतील नागरिकांसाठी महापालिकेच्या आठही विभाग कार्यालयांमध्ये कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर, ऑनलाइन पद्धतीनेही कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांत अभय योजनेचा लाभ घेतलेल्या पाच हजार ७४४ मालमत्ताधारकांपैकी सुमारे ५५ टक्के म्हणजेच तीन हजार १३४ जणांनी ऑनलाइन कर भरला आहे. यावरून नागरिकांचा डिजिटल सुविधांकडे वाढता कल स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com