वाशीमध्ये ‘जागतिक चिमणी दिवस’ उत्साहात
वाशीमध्ये ‘जागतिक चिमणी दिवस’ उत्साहात
चिमण्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांचा पुढाकार
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : वाशी येथे ‘जागतिक चिमणी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुर्भे येथील सेक्टर १ ते ६ ट्री बेल्ट परिसरात दिव्या वैभव गायकवाड फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरी भागातून झपाट्याने कमी होत चाललेल्या चिमण्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमादरम्यान चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी, पाणी पिण्याची भांडी तसेच दाणे ठेवण्यासाठी भांडी लावण्यात आली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना सुरक्षित व अनुकूल वातावरण मिळावे यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमात जेष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.
काँक्रीटच्या वाढत्या इमारती, मोबाईल टॉवर्समधील किरणोत्सर्ग, अन्न व पाण्याचा अभाव, तसेच कीटकनाशकांचा अति वापर यामुळे गेल्या दोन दशकांत शहरांमध्ये चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे तज्ञांनी सांगितले. एकेकाळी सहज दिसणारी चिमणी आज दुर्मिळ होत चालली आहे.
नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी नागरिकांना घराजवळ कृत्रिम घरटी लावणे, पाण्याची भांडी ठेवणे, दाणे देणे व झाडे लावण्याचे आवाहन केले. उपस्थितांनीही चिमणी संरक्षणाचा संकल्प व्यक्त केला. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

