एकवीरा देवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा

एकवीरा देवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा

Published on

एकवीरा देवी पालखी सोहळ्याला भाविकांची गर्दी

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) : मुलुंडमध्ये एकवीरा देवीचा पालखी सोहळा यंदा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारी (ता. २०) पार पडला. मुलुंड पूर्वेतील नवघर मैदान परिसरात आयोजित या सोहळ्याला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेत सजलेले भक्त आणि ‘एकवीरा आई’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होत देवीचे दर्शन घेतले.
मुलुंड पूर्व येथील एकवीरा देवी भक्त मंडळाच्यावतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता गव्हाणपाडा येथून पालखी मिरवणुकीची सुरुवात झाली. आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी, भजन-कीर्तनाचे स्वर आणि ढोल-ताशांच्या तालावर भक्तांनी केलेले नृत्य यामुळे वातावरण अधिकच भारावून गेले. ही पालखी मिरवणूक गव्हाणपाडा, नाणे पाडा, म्हात्रे नगर, साळवी वाडी, आझाद नगर, खंडोबा मंदिर परिसर आणि नवघर पाडा अशा विविध भागांतून मार्गक्रमण करत रात्री उशिरा संभाजी मैदानाजवळील तुंगतेश्वर मंदिर येथे विसावली. या मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे स्वागत करत आरती व पुष्पवृष्टी केली.
या वेळी प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. त्यांनी भाविकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या आणि अशा धार्मिक परंपरांमुळे समाजात एकात्मता व बंधुभाव वृद्धिंगत होतो, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, ही पालखी शनिवारी (ता. २१) दुपारी कार्ला लेणी परिसराकडे रवाना झाल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष कैलाश पाटील यांनी दिली. एकूणच, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com