कल्याण–अहिल्यानगर महामार्गाचे काम सुसाट

कल्याण–अहिल्यानगर महामार्गाचे काम सुसाट

Published on

कल्याण-अहिल्यानगर महामार्गाचे काम सुसाट
मुरबाड तालुक्याचा कायापालट
मुरबाड, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाने आता वेग घेतला असून, विशेषतः टोकावडे ते न्याहाडी यादरम्यान सुरू असलेल्या कामामुळे मुरबाड तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता मार्गी लागल्याने स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सध्या महामार्गाचे मजबुतीकरण अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने केले जात आहे. कामाचा वेग आणि दर्जा या दोन्ही गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि बांधकामाची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करून रस्त्यावर नियमित पाणी शिंपडले जात आहे. यामुळे प्रवाशांना धुळीचा त्रास कमी होत असून रस्त्याचे कामही भक्कम होत आहे.

मुरबाड नाक्याजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलामुळे भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. हा मार्ग मुंबई, ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर या चार महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा मुख्य दुवा असल्याने दळणवळण अधिक सुलभ होईल.

आदिवासी भागाला फायदा
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासी भागाला या महामार्गामुळे मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आहे. या सुधारित मार्गामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपला शेतीमाल आणि भाजीपाला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये जलद गतीने पोहोचवणे शक्य होणार आहे.

९५ टक्के काम पूर्ण
कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकल्पाचे अ‍ॅडमिन मॅनेजर प्रदीप रॉय यांनी कामाच्या प्रगतीबाबत माहिती देताना सांगितले की, कल्याण-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून, आतापर्यंत जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम सर्वांच्या सहकार्याने आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबवले जात आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण करून हा मार्ग प्रवाशांसाठी पूर्ण क्षमतेने खुला केला जाईल.

कल्याण-अहिल्यानगर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मुरबाड तालुक्याला एक नवा ‘लूक’ प्राप्त झाला आहे. या रस्त्यामुळे तालुक्यातील गावे अधिक सुंदर दिसत असून, प्रगतीची नवी दालने उघडली आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काम सुरू झाल्याने जनतेत समाधानाचे वातावरण आहे.
रमेश नारायण घरत, सामाजिक कार्यकर्ते (करचोंडे-मुरबाड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com