व्हॉट्सअँप कॉलवरून अपहरण केल्याची धमकी

व्हॉट्सअँप कॉलवरून अपहरण केल्याची धमकी

Published on

पुतण्याचे अपहरण केल्याची धमकी देत मागितली खंडणी!
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कॅम्प क्रमांक १ मधील एका २२ वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याचा बनाव रचून, त्याच्या सुटकेसाठी चक्क व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे तेजूमल चक्की परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

तेजूमल चक्की भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला १५ मार्चला सकाळी ८:३० च्या सुमारास एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. तुझ्या २२ वर्षीय पुतण्याचे आम्ही अपहरण केले आहे, त्याला सुखरूप पाहायचे असेल, तर पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी पलीकडून देण्यात आली. ही रक्कम तातडीने न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही अपहरणकर्त्यांनी दिला.

धमकीचा फोन आल्यानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने उल्हासनगर पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. ज्या नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला, त्याचे लोकेशन आणि तांत्रिक माहिती मिळवण्याचे काम सायबर शाखेच्या मदतीने सुरू आहे. कमी रकमेची मागणी आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलचा वापर पाहता, हे स्थानिक गुन्हेगारांचे कृत्य आहे की एखाद्या सायबर टोळीचा नवा फंडा, याचाही पोलिस तपास करत आहेत. आरोपींचा लवकरच छडा लावून तरुणाची सुटका केली जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com