एकविरा देवी जत्रेनिमित्त टोलमाफीची मागणी
एकवीरा देवी जत्रेनिमित्त भाविकांना टोलमाफी द्या!
मुख्यमंत्र्यांकडे मागणी
टिटवाळा, ता. २२ (वार्ताहर) : लोणावळा येथील कार्ला गडावर बुधवारी (ता. २५) व गुरुवारी (ता. २६) आयोजित होणाऱ्या आई एकवीरा देवीच्या वार्षिक जत्रेनिमित्त भाविकांना टोलमाफी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. टिटवाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंदर्भात साकडे घातले आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे आणि रायगडपट्ट्यातील लाखो आगरी-कोळी बांधवांसह सर्व भाविकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी चैत्र उत्सवाच्या निमित्ताने रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातून लाखो भाविक आपल्या खासगी वाहनांनी कार्ला गडाकडे प्रस्थान करतात. या दोन दिवसांत भाविकांची संख्या लक्षणीय असते, ज्यामुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. नवसपूर्तीसाठी येणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सामान्य भाविकांवर प्रवासाचा आर्थिक भार पडतो, हे लक्षात घेऊन टोलमाफीची मागणी करण्यात आली आहे. आई एकवीरा देवी ही संपूर्ण महाराष्ट्रातील आगरी-कोळी समाजासह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. जत्रेसाठी स्वराज्यरक्षक आणि भाविक मोठ्या संख्येने खासगी वाहनांनी येतात. शासनाने या भाविकांच्या भावना लक्षात घेऊन २५ व २६ मार्च रोजी टोलमाफी जाहीर करावी, जेणेकरून भक्तांचा प्रवास सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी दिली.
शासकीय निर्णयाकडे लक्ष
सरकार विविध सण आणि उत्सवांच्या काळात (उदा. गणेशोत्सव, पंढरपूर वारी) भाविकांना टोलमाफी देऊन दिलासा देते. त्याच धर्तीवर एकवीरा देवीच्या जत्रेसाठीही सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती विजयभाऊ देशेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासकीय तयारी सुरू
दुसरीकडे, जत्रेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि कार्ला परिसरात स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन सुरू झाले आहे. जर शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला, तर वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

