

हंडाभर पाण्यासाठी वणवण
मोखाडा तालुक्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष
मोखाडा, ता. २२ (बातमीदार)ः मोखाड्यातील गाव-पाड्यांमध्ये उन्हाच्या काहीलीने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही आदिवासींना पाणी मिळत नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या काहीलीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जलजीवन मिशन योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. मोखाड्यात तीन टॅकरद्वारे सहा गावपाड्यांना शासनाकडून टँकरद्वारे पुरवठा करण्यात येत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने, टंचाईग्रस्त गावपाड्यांत वाढ होऊ लागली आहे. तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीमधील धामणी येथे १५ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. काष्टी-सावर्डे ग्रामपंचायतीमधील आदिम कातकरी लोकवस्ती असलेल्या वडपाडा येथेही आदिवासींना टंचाईचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतीने पाच दिवसांपूर्वीच टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी अजूनही प्रशासनाने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलेला नाही.
---------------------------
खासदारांकडून दखल
वडपाडा येथील ग्रामस्थांनी खासदार डॉ. हेमंत सवरा शनिवारी मोखाडा दौऱ्यावर असताना पाणीटंचाईची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावेळी सवरांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंतांशी संपर्क साधून वस्तीत पाण्याची टाकी, नळजोडणीचा नवीन आराखड्यात समावेशाची सूचना केली. त्याबरोबरच गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने वडपाडा, धामणी येथे टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.