गॅस टंचाईने श्रीवर्धनमधील हॉटेल व्यवसाय संकटात
हॉटेल व्यावसायिकांना चुलीचा आधार
गॅसटंचाईमुळे श्रीवर्धनमधील व्यवसाय संकटात; पर्यटनावर परिणाम
श्रीवर्धन, ता. २३ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या श्रीवर्धनमध्ये गॅस सिलिंडर टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने काही हॉटेलांनी तात्पुरते शटर खाली ओढले असून, उर्वरित हॉटेलही बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. तर काही हॉटेलमालकांनी चुलीचा आधार घेतला आहे.
सिलिंडरचा पुरवठा अनियमित होत असल्याने छोट्या व्यावसायिकांना हॉटेल चालवणे कठीण झाले आहे. परिणामी, काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. मात्र या पद्धतीमुळे खर्च वाढत असून, सेवा देण्यातही अडचणी येत आहेत. श्रीवर्धन हा समुद्रकिनाऱ्यांमुळे प्रसिद्ध पर्यटन पट्टा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. अशा परिस्थितीत हॉटेल बंद पडू लागल्यास पर्यटकांची गैरसोय होण्याबरोबरच स्थानिक अर्थचक्रावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. खाणावळी, बीचवरील खाद्य स्टॉल तसेच होमस्टे व्यवसायावर याचा थेट परिणाम दिसून येत आहे.
व्यावसायिक गॅसचा स्वतंत्र कोटा उपलब्ध करावा
हॉटेलधारकांच्या मते, घरोघरी गॅस मिळतोय पण व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा स्वतंत्र कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, ही टंचाई लवकर दूर झाली नाही तर पर्यटन हंगामात श्रीवर्धनमधील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत आहे. दरम्यान, २ मार्चपासून व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर उपलब्ध होत नाहीत. कंपनीकडूनही त्याबाबतीत काही माहिती देण्यात आलेली नाही.
- समीर गंद्रे, एचपी गॅस वितरक, दिवेआगर
फोटोओळ
श्रीवर्धन : व्यावसायिक सिलिंडर नसल्याने हॉटेल व्यावसायिक चुलीवर जेवण बनवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

