वसई-विरार चकाचक
वसई-विरार चकाचक
दिवसातून तीन वेळा शहराची स्वच्छता, पालिकेचा निर्णय
वसई, ता. २२ (बातमीदार)ः परिसरातील अस्वच्छतेमुळे डासांच्या प्रादुर्भावाने आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. याच अनुषंगाने वसई-विरार शहर महापालिका क्षेत्र स्वच्छ राहावे यासाठी प्रशासनाने तीन वेळा शहर स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. शहरातील गृहसंकुले, औद्योगिक वसाहती, सार्वजनिक कार्यालये, भाजी मंडईतून शेकडो टन कचरा निर्माण होत असतो. हा कचरा क्षेपणभूमीवर जमा केला जातो. मात्र, अनेकदा सार्वजनिक परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक आहे. सकाळी साफसफाई केल्यानंतरही अनेक भागात ढीग जमा होत असल्याने त्यावर नियंत्रणासाठी सफाई कर्मचाऱ्यांना तीन पाळीमध्ये स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळ, दुपारी, रात्रीची वेळा निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच कोणत्या परिसरात सफाई कर्मचारी काम करत आहेत. त्यावर नजर ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा असलेली घड्याळे देण्यात येणार आहेत.
-------------------------------
विशेष नियंत्रण कक्ष
- घरोघरी सेवा, सोसायट्यांमधील कचरा संकलन, गटार साफसफाई तसेच क्षेपणभूमीवर कचरा पोहोचवण्यासाठी ठेकेदार कंपन्यांमार्फत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत डीप क्लीनिंग ड्राइव्ह सुरू आहे. दररोज एक ते दोन विभाग स्वच्छ करून करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
- कचरा वाहून नेणाऱ्या कॉम्पॅक्टर, घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. कचऱ्याची गाडी कोणत्या ठिकाणी सफाईसाठी जात आहे. याची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. ठेकेदार कंपन्यांमार्फत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत डीप क्लीनिंग ड्राईव्ह सुरू आहे.
---------------------------------------------
आरोग्याला प्राधान्य
वसई-विरार शहर शून्य कचरा मोहिमेसाठी पालिकेने मोहीम हाती घेतले आहे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी मार्शल पथकांना दिवसासह रात्री गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा रस्त्यावर उघड्या ठिकाणी टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
----------
सफाई कर्मचाऱ्यांची कामाची वेळ
- सकाळी ६ ते दुपारी २
- दुपारी २ ते रात्री १०
- रात्री १० ते सकाळी ६
---------------
वसई-विरार शहरात कचरा साचू नये, यासाठी पालिकेने मोहीम आखली आहे. त्यानुसार सफाई कर्मचारी दिवसातून तीनवेळा स्वच्छता करणार आहेत.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त

