महिलांचा दहीहंडीतील विश्वविक्रम

महिलांचा दहीहंडीतील विश्वविक्रम

Published on

महिलांचा दहीहंडीतील विश्वविक्रम
पार्ले स्पोर्ट्स क्लबचा गौरव; सात थर रचत इतिहास

जोगेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या महिला गोविंदा पथकाने प्रथमच सात थर रचत दहीहंडीमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ने घेत क्लबला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.
हिंदू नववर्षानिमित्त विलेपार्ले येथे आयोजित भव्य शोभायात्रेदरम्यान हा सन्मान सोहळा पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित पार्लेकरांच्या साक्षीने महिला पथकाने उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सात थर रचत विक्रम साकारला.
या कार्यक्रमास आमदार वरुण सरदेसाई (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आमदार संजय उपाध्याय (भाजप) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जनसेवा समितीचे पदाधिकारी मिलिंद करमरकर आणि गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार्ले स्पोर्ट्स क्लबला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य शिवाजी खैरनार यांनी महिलांची कामगिरी प्रेरणादायी असल्याचे सांगत, भविष्यात आणखी मोठे विक्रम घडवण्याची क्षमता या पथकात असल्याचा विश्वास व्यक्त केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विलेपार्ले परिसरात आनंदाचे वातावरण असून पार्ले स्पोर्ट्स क्लबचे कौतुक होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com