खारघर टेकडीवर स्वच्छता मोहिम

खारघर टेकडीवर स्वच्छता मोहिम

Published on

खारघर टेकडीवर स्वच्छता मोहीम
विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : के. जे. सोमय्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी खारघर टेकडी परिसरातील प्लॅस्टिक, कागद, बाटल्या व इतर कचरा गोळा करून स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबवला. निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम आयईटीई स्टुडंट्स कौन्सिलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
वाढत्या शहरीकरणामुळे टेकड्यांवर वाढणारे प्रदूषण आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन के. जे. सोमय्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. २१) समूहाने काम करीत टेकड्यांवरील विविध भाग स्वच्छ केले. काहींनी कचरा संकलन तर काहींनी जनजागृतीचे काम हाती घेतले. या स्वच्छता मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी खारघर टेकडी परिसरात प्लॅस्टिक, कागद, बाटल्या व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. ‘टेकड्या वाचवा, निसर्ग जपा’ आणि ‘प्लॅस्टिकमुक्त परिसर’ या संकल्पनांना बळ देत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
या उपक्रमासाठी खारघर हिल्स वेलफेअर असोसिएशन, निसर्ग फ्रेंडशिप सोसायटी तसेच सजग नागरिक मंच यांच्या सदस्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सुरेश थोरात, डॉ. किरण अजेटराव आणि सुहास माने यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश उकारांडे यांचे मार्गदर्शन लाभले असून, विभागप्रमुख डॉ. भारती सिंग तसेच प्राध्यापक डॉ. किरण अजेटराव आणि बैशाखी दत्ता यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करून उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली. महाविद्यालयातर्फे भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करून सेव्ह हिल्स, सेव्ह नेचर आणि नो प्लॅस्टिक या संकल्पनांचा प्रसार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com