शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांना अभिवादन
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. २४) अभिवादन मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहीद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम होणार असून, विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था; तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील सचान कुटुंबातील सुपुत्र कॅप्टन विनयकुमार सचान यांनी देशरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या बलिदानाला यंदा २३ वर्षे पूर्ण होत आहेत. स्मृतिदिनानिमित्त सकाळी ८ वाजता वीर सावरकर वाचनालय, एमआयडीसी निवासी विभाग येथे कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर सचान यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. पुढे दिव्यज्योत प्रज्वलित करून मिरवणुकीद्वारे ही ज्योत घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकापर्यंत नेण्यात येणार आहे. शहीद सचान यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे यांनी केले आहे.

