७७ गावांच्या पाणीपुरवठ्यावर संकट
७७ गावांच्या पाणीपुरवठ्यावर संकट
उमटे धरणातील गाळप्रश्न रखडला; संघर्ष ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : उमटे धरणातील साचलेला गाळ काढणे व संरक्षण भिंतींच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदार न मिळाल्याने रखडले आहे. यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या ७७ गावांवर ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम ठेकेदार नेमून गाळ व पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी उमटे धरण संघर्ष ग्रुपचे राकेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत धरण दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी ३१ जानेवारी २०२५ रोजी सुमारे आठ कोटी ८१ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाची पहिली ई-निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारी, १७ मार्च आणि १५ एप्रिल २०२५ला आणखी तीन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या; मात्र पहिल्या तीन निविदांना एकाही कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्या निविदेत दोन कंत्राटदारांनी अर्ज दाखल केले; परंतु आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांची निविदा बाद करण्यात आली. परिणामी, धरण दुरुस्ती व गाळ काढण्याचा प्रश्न पुन्हा प्राधिकरणाच्या पातळीवर प्रलंबित राहिला आहे. उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी तातडीने समिती नेमून पात्र ठेकेदाराची नियुक्ती करावी, तसेच धरणाची दुरुस्ती पूर्ण करून नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
उमटे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आणि धरणातील वाढता गाळ यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याऐवजी गाळमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून उमटे धरण संघर्ष ग्रुपने लोकसहभागातून गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता. विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सहभाग घेत काही प्रमाणात कामही केले. मात्र, कायमस्वरूपी तोडगा निघू शकला नाही.
उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठीची सरकारची भूमिका फसवी आहे, धरणाचा गाळ काढण्यासाठी एकही ठेकेदार मिळत नसेल, तर शासनाने निविदेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करून गाळ काढावा. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे.
- ॲड. राकेश नारायण पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

