दिघा-शिरवणे परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

दिघा-शिरवणे परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

Published on

​वाशी, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिघा ते शिरवणे झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून या भागात भेडसावणारा अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने होणारे वितरण या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या योजनेअंतर्गत आता या परिसराला महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून थेट आणि नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

​सध्या दिघा ते शिरवणे भागातील नागरिकांना एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा पुरवठा अत्यंत विस्कळित झाला असून, अनेकदा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहतो. यामुळे येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता, महापालिकेने तांत्रिक सल्लागार मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्यामार्फत सविस्तर सर्वेक्षण करून घेतले. या अहवालानुसार या भागात योग्य दाबाने पाणी पोहोचवण्यासाठी पारसिक हिल एम.बी.आर. ते महापे जंक्शनपर्यंत १५०० मिमी व्यासाची आणि सुमारे १४ किमी लांबीची एक स्वतंत्र मुख्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, यासाठीचे कार्यादेश ३ फेब्रुवारीला देण्यात आले आहेत.

१८ महिन्यांची मुदत
१८ महिन्यांचा कालावधी असलेल्या या कामाची पूर्णत्वाची मुदत २ ऑगस्ट २०२७ निश्चित करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष जागेवर भूगर्भीय तपासणी, साहित्य खरेदी आणि जलवाहिनीचे नियोजन ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ​ही नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईत दोन स्वतंत्र मुख्य जलवाहिन्या उपलब्ध होतील.

पाण्यासाठीचा वनवास संपणार
बेलापूर ते वाशी आणि कोपरखैरणे ते दिघा अशा दोन्ही मोठ्या विभागांमध्ये पाण्याचे समान आणि योग्य दाबाने वाटप करणे शक्य होणार आहे. विशेषतः दिघा, ऐरोली, घणसोली या झोपडपट्टीबहुल क्षेत्रातील नागरिकांना यापुढे नियमित पाणी मिळणार असून, त्यांचा पाण्यासाठीचा वनवास आता कायमचा संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com