निंबवली टोल प्लाझावर अनियमिततेचे आरोप
निंबवली टोल प्लाझावर अनियमिततेचे आरोप
टोल माफीप्रकरणी वकिलांची तक्रार; चौकशीची मागणी
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : समृद्धी महामार्गावरील कल्याण तालुक्यातील निंबवली टोल प्लाझा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टोल वसुलीतील अनियमितता, व्यवस्थापनाचा अभाव आणि प्रवाशांशी होणारे गैरवर्तन याविरोधात वकिलांनी आक्रमक पवित्रा घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून माफीनामा घेण्यात आल्याचे समजते.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, टोलनाक्यावर एका खासगी वाहनाला ओळखपत्र दाखवल्यानंतर कोणतीही फी न आकारता सोडण्यात आले. अधिकृत नियमात बसत नसताना ही टोलमाफी का देण्यात आली, असा सवाल उपस्थित केला असता तेथील कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘वाहन पोलिसांचे होते’ असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्याने, वाहन खासगी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर ‘कमिशनर होते, तुम्हाला काय करायचे आहे,’ असे म्हणत प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या टोलनाक्यावरून दुचाकीस्वारांचीही नियमबाह्य वाहतूक होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. घटनेच्या वेळी टोल प्लाझावर कोणताही जबाबदार व्यवस्थापक उपस्थित नव्हता. अश्मी रोड करिअर या कंपनीकडे या नाक्याचा ठेका असून, व्यवस्थापकांच्या अनुपस्थितीत कोणताही पर्यायी अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कायदेशीर मागणी
ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड आणि ॲड. महेश गायकवाड यांनी याप्रकरणी संबंधित प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नियमबाह्य टोलमाफीची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्यवस्थापकाचे स्पष्टीकरण
निंबवली टोलनाक्याचे व्यवस्थापक समीर शेख यांनी सांगितले, की संबधित दिवशी मी सुट्टीवर होतो. ते वाहन टिटवाळा पोलिस ठाण्यातील एका एपीआय अधिकाऱ्याचे असल्याने सोडण्यात आले होते. तसेच, संबंधित कर्मचाऱ्याच्या उद्धट वर्तनाबद्दल त्याला ‘वॉर्निंग लेटर’ देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

