अर्नाळा पोलीस स्टेशनला रंगले सागरी कविसंमेलन
अर्नाळामध्ये रंगले सागरी कविसंमेलन
नवी मुंबई, डोंबिवली, भाईंदर, वसई-विरारहून संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
विरार, ता. २३ (बातमीदार) : अर्नाळाच्या निसर्गसंपन्न अशा सागरीकिनारा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यंगस्टार्सचे अध्यक्ष, लोकनेते व माजी आमदार हितेंद्र ठाकूर व समन्वयक महापौर अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कविसंमेलनात नवी मुंबई, मालाड, डोंबिवली, बोईसर, भाईंदर नायगाव, नालासोपारा, वसई आणि विरारमधील कवींनी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कविसंमेलनात विविध विषयांवर काव्य रचण्यात आले. चीनच्या गलवान घाटीत शहीद झालेले सैनिक असो वा मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी असो, त्यांच्या बलिदानाबाबत शौर्य गाथा असलेल्या कवितांचे सादरीकरण या संमेलनात करण्यात आले. तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंना बांधही फुटला. तसेच या वेळी विनोदी, निसर्ग, प्रेम कविता व समुद्राच्या विविध छटांवर कविता सादर करण्यात आल्या. या वेळी अर्नाळा पोलिस सागरीकिनारा स्टेशनमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. खासकरून विद्यार्थ्यांना पोलिसांबाबत भीती वाटू नये म्हणून सायकलिंग, चित्रकला अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ‘पोलिस मित्र’ या संदर्भातील संदेशही मुलांच्या मनात बिंबवला जातो, अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष व सागरी पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी या वेळी दिली. तसेच चावडीचे सरपंच प्रफुल्ल थोरात यांनी पोलिसांवर आधारित कविता सादर केल्या. सेंट अगस्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक सतीश पाटील यांनी उपस्थिती लावून कवितांचा आनंद घेतला.
या वेळी ॲड. नयन जैन यांनी कवितांसह शायरीही सादर केल्या. तसेच तृप्ती भंडारे, ॲड. निखिल नाईक, नयना हळबे, समीर पराडकर, सुरेश घरत, निशांत ठाकूर, श्रुती रसाळ, मोहन वायकोळे, सुभाष नाईक, विक्रांत लाळे, मानसी शिगवण, गया गवळी, धनंजय पाटील, स्वाती नाईक, सुचित्रा पितळे, विद्या गिरीधर, प्रिती तिवारी, सुप्रिया घोरपडे, मंजुषा गवई, सिमंतिनी जोशी अशा तब्बल चाळीसपेक्षा जास्त सहभागी कवींनी आपल्या कविता अर्नाळा सागरी पोलिसांनी आयोजित संमेलनात सादर केल्या. या वेळी सरपंच व पाहुण्यांचा परिचय हा साहित्यिक विक्रांत केसरकर यांनी केला. मधुकर तराळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले, तर माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे यांनी पोलिस कर्मचारी व उपस्थितांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

