दिवसा मिस्त्री काम; रात्री दुचाकी चोरी

दिवसा मिस्त्री काम; रात्री दुचाकी चोरी

Published on

दिवसा मिस्त्री, रात्री दुचाकी चोर!
नशेच्या आहारी गेलेल्या गुन्हेगाराला कल्याणमध्ये बेड्या
डोंबिवली, ता. २३ : दिवसा मिस्त्री म्हणून काम करणारा तरुण रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी ललित देवरे (३३) या सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पतीच्या या कृष्णकृत्याची माहिती मिळताच त्याची पत्नीही अवाक् झाली आहे.

कल्याण परिसरातील वाढत्या वाहनचोरीच्या तक्रारींची दखल घेत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी तपासाचे आदेश दिले होते. अधिकारी विकास मडके व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे संशयित आरोपी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे असल्याची खात्री केली. पोलिसांनी तिथे सापळा रचून ललितला ताब्यात घेतले, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात ललित देवरे याच्याबद्दल काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ललित दिवसा मिस्त्रीचे काम करून उदरनिर्वाह करायचा, मात्र त्याला नशेचे व्यसन जडले होते. नशेसाठी लागणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. त्याने चोरलेल्या चार दुचाकींपैकी एक दुचाकी थेट जळगावमध्ये नेऊन विकली होती. ललित हा कामाला जात असल्याचे सांगून घरून बाहेर पडायचा; मात्र तो वाहन चोरीच्या गुन्ह्यात अडकल्याचे समजताच त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला. मिस्त्रीकाम करणारा पती चोरी करतो, हे वास्तव ऐकून ती चक्रावून गेली आहे.

पोलिसांचे आवाहन
ललितने अजून किती ठिकाणी डल्ला मारला आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. नागरिकांनी आपल्या वाहनांना सुरक्षित ठिकाणी पार्क करावे आणि परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com