ऐन उन्हाळ्यात केडीएमटीची एसी बससेवा ठप्प
ऐन उन्हाळ्यात केडीएमटीची एसी बससेवा ठप्प
कंत्राट संपल्याने ठेकेदाराने सेवा रोखली; डोंबिवलीकर घामाघूम
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : एकीकडे सूर्याचा पारा चढत असतानाच, कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित (एसी) बससेवेचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराचे कंत्राट संपल्याचे कारण पुढे करत शुक्रवारी (ता. २०) सायंकाळपासून ही सेवा अचानक बंद करण्यात आली. परिणामी, उन्हाच्या तडाख्यात थंडगार प्रवासाची आशा बाळगणाऱ्या प्रवाशांना आता साध्या बसमध्ये गर्दीत घामाघूम होऊन प्रवास करावा लागत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौक ते एमआयडीसी निवासी विभाग हा मार्ग प्रवाशांच्या पसंतीचा आणि गर्दीचा आहे. या मार्गावरील एसी बससेवा विशेष लोकप्रिय होती; मात्र आता सेवा ठप्प झाल्याने सकाळ-संध्याकाळच्या कामाच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. साध्या बसमध्ये उभ्याने प्रवास करताना वाढत्या तापमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल अधिकच वाढले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एसी बस चालवणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट सुमारे आठ महिन्यांपूर्वीच संपले होते. तरीही ही सेवा ओढूनताणून सुरू होती. आता ठेकेदाराने सर्व मार्गांवरील आठ एसी बस बंद केल्या आहेत. त्यामुळे या महागड्या गाड्या आता डेपोत धूळखात पडून राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
उद्यानांनाही कंत्राटी पद्धतीचा शाप
केवळ बससेवाच नाही, तर डोंबिवली एमआयडीसीमधील धर्मवीर आनंद दिघे उद्यानालाही कंत्राटी पद्धतीचा फटका बसला आहे. तेथील सुरक्षा रक्षकाचे कंत्राट संपल्याने हे उद्यान सायंकाळी बंद ठेवले जात आहे. यामुळे सुट्टीच्या दिवसांत मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागा उरलेली नाही.
नागरिकांची मागणी
महापालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधींची सत्ता असूनही अशा जीवनावश्यक सेवांबाबत निर्णय घेण्यास विलंब का होत आहे? प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नवीन कंत्राट प्रक्रिया राबवावी आणि तोपर्यंत उपलब्ध असलेल्या एसी बस किमान गर्दीच्या वेळी तरी सुरू ठेवाव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

