माणगावच्या अपेक्षा शेट्टीचा ४००० किमींचा धाडसी सोलो प्रवास

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचा ४००० किमींचा धाडसी सोलो प्रवास

Published on

माणगावच्या कन्येची काश्मीर ते कन्याकुमारी भरारी
अपेक्षा शेट्टीचा चार हजार किमीचा सोलो प्रवास यशस्वी
माणगाव, ता. २३ (वार्ताहर) ः हिमालयाच्या कुशीतून सुरू झालेला प्रवास अथांग समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात, पण ते प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस मोजक्याच व्यक्तींकडे असते. असेच धाडस माणगावची कन्या अपेक्षा राय-शेट्टी हिने करीत तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास बाइकवरून एकटीने यशस्वीपणे पूर्ण केला. तिच्या या मोहिमेचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुक होत आहे.
अपेक्षा शेट्टीचे बालपण माणगाव शहरातच गेले. तिचे शिक्षण माणगाव कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण झाले. ती माणगावातील श्रद्धा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका हेगडे यांची सुकन्या आहे. त्यामुळे तिच्या या यशामुळे माणगाव शहरातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे. सध्या अपेक्षा शेट्टी या एका खासगी संस्थेत लर्निंग अँड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिक आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी केलेला हा साहसी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. एकटीने प्रवास करताना येणारी मर्यादा आपणच आखतो आणि धाडस केले तर त्या मोडून पुढे जाता येते. रस्त्यावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलची जबाबदारी, सुरक्षिततेचे भान आणि सतत पुढे जाण्याची जिद्द या तीन मूल्यांनी हा प्रवास अधिक अर्थपूर्ण बनवला. आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे, असे अपेक्षा शेट्टीने सांगितले.

१२ राज्यांतून संस्कृतीचे दर्शन
भारताच्या उत्तर ते दक्षिण कण्याला स्पर्श करणाऱ्या या प्रवासात अपेक्षा शेट्टी हिने १२ राज्यांतून प्रवास करीत भारताची विविधता आणि संस्कृती जवळून अनुभवली. जम्मू, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून प्रवास करीत ती अखेर कन्याकुमारीपर्यंत पोहोचली. प्रवासातील अनिश्चितता, हवामानातील बदल, शारीरिक थकवा आणि तांत्रिक अडचणी अशा अनेक आव्हानांना अपेक्षाने धैर्याने सामोरे जात प्रत्येक टप्पा पार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com