मिरा-भाईंदरमध्ये सिलिंडरसाठी रांगा

मिरा-भाईंदरमध्ये सिलिंडरसाठी रांगा

Published on

मिरा-भाईंदरमध्ये सिलिंडरसाठी रांगा
आखाती देशातील युद्धामुळे मागणीत वाढ
भाईंदर, ता.२३ (बातमीदार): मिरा-भाईंदर शहरात गॅस सिलिंडरची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांनी गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा असला तरी घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित सुरू ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. जिल्हा पुरवठा विभागानेही त्यानुसार गॅस वितरकांना आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतरही सिलिंडरची टंचाई जाणवू लागली आहे. मिरा-भाईंदर शहरात बहुसंख्य ठिकाणी पाईप गॅसद्वारे गॅस पुरवठा केला जात असला तरी काही ठिकाणी एलपीजी गॅसचा वापर केला जात आहे. अशातच सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांना सिलिंडर मिळविण्यासाठी वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागत आहेत.
------------------------------
संभ्रमाची स्थिती
सिलिंडरची आवक सुमारे चाळीस टक्क्यांनी कमी झाली आहे. अनेक ग्राहक पुन्हा पुन्हा सिलिंडरची मागणी नोंदवत असल्याने प्रलंबित गॅस सिलिंडर पुरवठ्याची यादी वाढत असल्याची माहिती गॅस वितरकांकडून देण्यात आली. तर पूर्वी सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर लगेच नोंदणी झाल्याचा संदेश मोबाईलवर येत होता. मात्र, आता नोंदणीचा संदेश तीन ते चार दिवसांनी येत असल्याने संभ्रमाची स्थिती असल्याचे मंदार डोके यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com