गुढीपाडव्याला ‘गृह गुरुकुल’चा संकल्प

गुढीपाडव्याला ‘गृह गुरुकुल’चा संकल्प

Published on

गुढीपाडव्याला ‘गृह गुरुकुल’चा संकल्प
वाड्यातील उत्सवात १७२ गावांचा सहभाग; कुटुंबव्यवस्थेला बळकटी
मुंबई, ता. २३ : देशात वाढते शहरी स्थलांतर, कुटुंबव्यवस्थेतील विघटन आणि सांस्कृतिक मुळांपासून दूर जात असलेल्या नव्या पिढीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वाडा येथे गुढीपाडव्यानिमित्त एकतारा गुरुकुलतर्फे आयोजित त्रिकर्म उत्सवादरम्यान १७२ गावांतील १,००७ कुटुंबांनी ‘गृह गुरुकुल’ उभारण्याचा सामूहिक संकल्प केला.
हा उपक्रम देशासाठी नवा सामाजिक आदर्श ठरेल, अशी खात्री समाजसेवी संस्था व्यक्त करीत आहेत. या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, वाडा नगरपंचायत अध्यक्ष रीमा गंधे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय कार्यकर्ते संजय गोडसे, वाडा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद खोसला, गोवर्धन इको व्हिलेजचे प्रतिनिधी अभिमन्यू प्रभूजी, एकतारा गुरुकुलचे संचालक आकाश नारायण बिस्वास आणि कार्यक्रम व्यवस्था प्रमुख मिलिंद वाडेकर उपस्थित होते.
या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेले ‘गृह गुरुकुल अभियान.’ हे कुटुंबाला पुन्हा शिक्षण, संस्कार आणि कुलपरंपरेशी जोडणारे केंद्र बनवण्यावर आधारित आहे. कुटुंब म्हणजेच पहिला गुरुकुल या संकल्पनेतून १७२ गावे आणि १,००८ कुटुंबांनी एकत्र येत जीवनमूल्यांचा पुनर्जागरणाचा संकल्प केला. आयोजक आकाश नारायण बिस्वास म्हणाले, की जोपर्यंत माता आणि पिता स्वतः गुरू बनत नाहीत तोपर्यंत घर प्राथमिक गुरुकुल बनू शकत नाही. घर गुरुकुल नसेल तर नवी पिढी मुळांपासून दूर जाईल आणि त्यामुळे स्थलांतर, जमीन वाद व कुटुंब विघटन वाढेल. ‘गृह गुरुकुल’ हा यावर प्रभावी उपाय ठरू शकतो.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेले ‘आईचा पदर’ हे भव्य स्वागत द्वार सुमारे ४५० मातांच्या साड्यांपासून उभारण्यात आले होते. कार्यक्रमात गावदेवी सजावट स्पर्धेत कोने गावाला प्रथम (रु. २५,०००) आणि भोपिबली गावाला द्वितीय (रु. १५,०००) पारितोषिक मिळाले. तसेच सर्वात मोठ्या संयुक्त कुटुंब सन्मानात श्रीराम भास्कर अंबावणे परिवार (प्रथम क्रमांक), जयवंत मोतीराम अंबावणे परिवार (द्वितीय) आणि पालकर बंधू परिवार (तृतीय) सन्मानित झाले. कुलवृक्ष स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर ३५ महिलांनी गुढीपाडवा फॅशन शोमध्ये पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण केले. एकतारा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले भरतनाट्यम्, तबलावादन, गायन, तारपा नृत्य आणि नाट्यप्रयोग यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले‌.

भारतीय परंपरा जपण्याचा प्रयत्‍न
या उपक्रमात १७२ गावांतील सरपंच, पोलिस पाटील, माध्यम प्रतिनिधी आणि हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी एकतारा गुरुकुलच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय परंपरा जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. परंपरा, चालीरीती आणि संस्कार हे भारताचे वैशिष्ट्य असून त्यांचे जतन होणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com