लग्न निमंत्रणात दारातील अक्षता संपली
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २४ : एकेकाळी लग्नाचे निमंत्रण म्हणजे नातेवाइकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन, दारात अक्षता ठेवून, आपुलकीने आमंत्रण देण्याची परंपरा होती. काळाच्या ओघात छापील आणि आकर्षक पत्रिकांनी त्या परंपरेची जागा घेतली. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे व्हॉट्सॲप, समाज माध्यमांवर डिजिटल निमंत्रणांचा कल झपाट्याने वाढत आहे. यात पारंपरिक लग्नपत्रिका हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.
आजकाल ''स्टेटस'', ''ब्रॉडकास्ट'' किंवा ग्रुपमध्ये डिजिटल कार्ड शेअर करून लग्नाचे आमंत्रण दिले जात आहे. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होत असली, तरी पाहुण्यांना निमंत्रित करताना व्यक्त होणारी आपुलकी, सन्मान आणि भावनिक नात्यांची ऊब कमी होत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. तंत्रज्ञानाने जीवनशैली अधिक सोयीस्कर केली असली तरी नात्यांतील प्रत्यक्ष भेटीचा स्पर्श हरवत चालला आहे. ''एका क्लिकवर हजारो लोकांपर्यंत निमंत्रण पोहोचते.
तरुण पिढी वेळेची बचत आणि खर्च टाळण्यासाठी डिजिटल निमंत्रणांचा पर्याय स्वीकारत आहे. काही ठिकाणी आकर्षक व्हिडिओ, ॲनिमेशन किंवा ई-कार्ड तयार करून पाठवले जात आहेत. मात्र वडीलधाऱ्या मंडळींना ही पद्धत फारशी रुचत नाही. प्रत्यक्ष भेटीतून व्यक्त होणारा स्नेह आणि नात्यांची जवळीक अधिक महत्त्वाची वाटते.
छपाई व्यवसायावर संकट
डिजिटल निमंत्रणांच्या वाढत्या वापराचा परिणाम छपाई व्यवसायावरही झाला आहे. पूर्वी शेकडो पत्रिका छापल्या जात होत्या. आता केवळ ५० ते १०० पत्रिकांवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे या व्यवसायातील उलाढाल घटली असून अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. समाज माध्यमांवर वेळ आणि पैशांची बचत होते. मात्र, यात आम्ही लाखो रुपये खर्च करून उभारलेला प्रेस व्यवसाय अडचणीत आला आहे. कर्जफेडीची चिंता वाढली आहे, अशी भावना व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असूनही पत्रिका छपाईसाठी ग्राहकांची वर्दळ काही वर्षांच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे. ५० ते १०० पत्रिका छापून उर्वरित निमंत्रण डिजिटल माध्यमातून दिले जात असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.
- नारायण भोईर, छपाई व्यावसायिक, शहापूर

