तारापूर औद्योगिक क्षेत्रात केमिकल गळती

तारापूर औद्योगिक क्षेत्रात केमिकल गळती

Published on

तारापुरात पुन्हा वायुगळती

कामगार बाधित; कंपनीविरोधात गुन्हा दाखल

बोईसर, ता. २३ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात डाय मिथाईल सल्फेट रसायनाच्या गळतीमुळे १७ कामगार बाधित झाल्याची घटना घडली. ओव्हरफ्लोमुळे झालेल्या या दुर्घटनेनंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती फार्मलॅब लिमिटेड (युनिट-६), प्लॉट क्रमांक डी-१८ येथे रविवारी (ता. २२) दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास डाय मिथाईल सल्फेट (डीएमएस) या रसायनाची गळती झाल्याची घटना घडली. या गळतीमुळे कारखान्यातील सुमारे १७ कामगार बाधित झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, टँकरमध्ये रसायन भरण्याची प्रक्रिया प्रवाहमापक यंत्राद्वारे सुरू असताना अचानक ओव्हरफ्लो झाला आणि रसायन वेंट लाइनमधून बाहेर पडले. जमिनीवर सांडलेल्या रसायनातून विषारी वायू निर्माण होऊन काही वेळातच परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. यामुळे कामगारांना खोकला, श्वास घेण्यास त्रास तसेच डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे जाणवू लागली.

वायुगळतीनंतर बाधित सर्व कामगारांना तत्काळ बोईसर येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असून, जीवितास कोणताही धोका नाही; मात्र हेमंत भदाणे या कामगाराची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८६ आणि २८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
वायुगळती घटनेमुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन आणि संबंधित कंपन्यांची जबाबदारी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कामगार आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com