ब्रिज पूर्णतेच्या उंबरठ्यावर
उड्डाणपुलामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नागरिकांकडून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
तलासरी, ता. २३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील इभाडपाडा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कार्य आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र निष्काळजी आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या उड्डाणपुलाच्या बाहेरील भागात चक्क एक ते दोन फूट लांबीच्या सळ्या बाहेर तशाच लटकत असल्यामुळे नागरिकांनी त्याबाबत अपघाताची भीतीही व्यक्त केली आहे. दरम्यान, यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
मागील अनेक दिवसांपासून या उड्डाणपुलाचे कार्य सुरू आहे. तसेच महामार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता, या उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत म्हणावी तितकी काळजी घेतली गेले नसल्याचे मत येथील स्थानिकांनी व्यक्त केले आहे. हा उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात झाल्यापासून या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, स्थानिक नागरिकांना तिचा सामना करावा लागत आहे. अशात या उड्डाणपुलाच्या बाहेरील भागातील एक ते दीड फूट लांबीच्या सळ्या बाहेर आल्यामुळे वाहनचालकांना आपली गाडी जपून चालवावी लागत आहे. कारण जरा चूक झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालकांनीही व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेकदा महामार्ग प्रशासनाशी संपर्क साधून या परिस्थितीची जाणीव करून दिली, मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली. तसेच ठेकेदाराची निष्काळजी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे येथे अपघात झाल्यावरच ते जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------
दरम्यान, संबंधित यंत्रणांनी या गंभीर बाबींची तत्काळ दखल घेत पुलावरील धोकादायक सळ्या तातडीने काढणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवणे अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
--------------
कोट
उड्डाणपुलाच्या चारही कोपऱ्यांवर एक ते दीड फूट लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत बाहेर आल्या आहेत. ही अत्यंत गंभीर व धोकादायक बाब आहे. संबंधित ठेकेदाराकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांकडूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी तत्काळ कारवाई करून योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात.
- सदानंद धोडी, इभाडपाडा, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

