प्राचीन वारसा विहीर फेरीतुन विद्यार्थ्यांना समजले ऐतिहासिक महत्त्व
विहीर फेरीतून जलसंवर्धनाचा संदेश
जागतिक जल दिनानिमित्त कल्याणमध्ये उपक्रम
कल्याण, ता. २४ (वार्ताहर): शहरातील प्राचीन विहिरींचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने श्री गजानन विद्यालय, पर्यावरण दक्षता मंडळ व एन्व्हायरो व्हिजिल यांच्या संयुक्त विद्यमाने ''प्राचीन वारसा विहीर फेरी'' काढण्यात आली. जागतिक जल दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तेली आळी, निकते वाडा, मुरलीधर आळी आणि पारनाका परिसरातील पाच ब्रिटिशकालीन प्राचीन विहिरींना भेट दिली. यावेळी विहिरींची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यांचे तत्कालीन महत्त्व पाहून विद्यार्थी थक्क झाले. श्री गजानन विद्यालय प्रसारक मंडळाचे सचिव केदार पोंक्षे स्वतः या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले होते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पर्यावरण दक्षता मंडळाचे आदित्य कदम आणि समीक्षा यांनी विद्यार्थ्यांना विहिरींच्या बांधकामाचे प्रकार, खोली मोजण्याचे पुरातन एकक (पुरुष), आणि पाणी साठवणुकीच्या जुन्या पद्धतींची सविस्तर माहिती दिली. वाढते जलसंकट पाहता या विहिरी भविष्यात कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतात, यावर यावेळी चर्चा झाली. विहिरींची सध्याची दुरावस्था, स्वच्छतेचा अभाव आणि ''रेन वॉटर हार्वेस्टिंग''चे महत्त्व यावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
वारसा जपण्याचे आवाहन
केदार पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करताना, कल्याणातील हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन केले. "मिळालेली माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबापर्यंत पोहोचवून जलसंपत्तीविषयी जागरूकता निर्माण करा," असे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शहराच्या इतिहासाबद्दल अभिमान आणि पाण्याचा योग्य वापर करण्याविषयी जाणीव निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

