गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सत्कार ः गायक पद्मश्री सुरेश वाडकरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : आपल्या गायकीने मराठी गझल सातासमुद्रापार पोहोचविणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारानिमित्त ‘स्नेहगझल’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २९) दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथहा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार असून प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती असणार आहे.
मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचविणारे, मराठी गझलला आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवून देणारे गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे ३० मार्च रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले आहे. मराठी गझलला सातासमुद्रापार नेले. तिला लोकप्रियता मिळवून दिली. गझल कार्यशाळा, गझल मुशायरे, गझल मैफिली आयोजित करून मराठी गझल लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. मराठी गझलला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी गझल संमेलने आयोजित केली. या प्रवासात त्यांना अनेक साथीदार मिळाले. त्यांच्या साथीने हा गझलप्रवास अधिक व्यापक आणि समृद्ध होत गेला. त्या सर्व जुन्या-नव्या साथीदारांच्या साक्षीने हा सोहळा नटणार आहे.
गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलसाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल राज्य आणि केंद्र शासन तसेच अनेक संस्थांनी घेत त्यांना सन्मानित केले आहे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने भारतरत्न लता मंगेशकर यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मराठी आणि उर्दू गझलांची ‘स्नेहमैफिल’
या सोहळ्याचे निमित्त साधून गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य मैफिल आयोजित करण्यात आली असून ही मैफिल सर्वांसाठी विनाशुल्क आहे. या मैफिलीच्या सन्मानिका राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपलब्ध असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

