कल्याणच्या विद्यार्थ्यांनी गाठले ''महाराष्ट्राचे एव्हरेस्ट
कल्याणच्या विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर
दहावीच्या परीक्षेनंतर २३ विद्यार्थ्यांची यशस्वी मोहीम
कल्याण, ता. २४ (बातमीदार) ः दहावीची परीक्षा संपल्यानंतर अनेक मुले मोबाईल गेम्स किंवा वॉटर पार्कच्या सहलीत रमतात; मात्र कल्याणच्या लोककल्याण पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या सर्वांना फाटा देत एक धाडसी पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर (१,६४६ मीटर) यशस्वी चढाई करत नवा आदर्श निर्माण केला आहे.
प्रसिद्ध गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम आखण्यात आली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या या शिखराला ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ मानले जाते. कठीण चढण आणि पहिल्यांदाच गिर्यारोहण करत असूनही, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हे आव्हान स्वीकारले. विद्यार्थ्यांनी सायंकाळच्या सुमारास शिखराकडे कूच केली. वाटेतील नैसर्गिक अडचणी आणि थकव्यावर मात करत, अखेर पहाटे ६ वाजता या विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. उदयाला येणाऱ्या सूर्याच्या साक्षीने शिखरावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता.
गिर्यारोहणातील ‘नवे’ वीर
या यशस्वी मोहिमेत स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर हिच्यासह तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर, शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर, रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे आणि आर्या गुरव या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
सुट्ट्यांचा सदुपयोग
प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे या विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक क्षमतेची प्रचीती दिली आहे. अभ्यासाच्या तणावातून मुक्त झाल्यावर थेट निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन शौर्य गाजवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

