शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासात महिला चालू लागली
गंंभीर स्थूल महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
विरार, ता. २४ (बातमीदार) : मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात गंभीर स्थूल महिलेवर यशस्वी शस्त्रकिया पार पडली. महत्त्वाचे म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत ही महिला चालू लागली. शस्त्रक्रियेपूर्वी या महिलेचे वजन तब्बल १२७ किलो होते. ही शस्त्रक्रिया प्रगत सूक्ष्मछिद्र पद्धतीद्वारा स्थूलता व चयापचय तज्ज्ञ डॉ. राजीव मानेक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे केली.
गंभीर स्थूलता ही केवळ वजन वाढण्यापुरती मर्यादित नसून मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वास रोखणे, सांधेदुखी आणि थकवा अशा अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे जीवनमानावर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्थूलता व चयापचय शस्त्रक्रिया ही वजन कमी करण्यासाठी आणि संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वाधिक परिणामकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती मानली जाते. या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘शस्त्रक्रियेनंतर जलद पुनर्प्राप्ती’ या तत्त्वावर आधारित विशेष उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामुळे शस्त्रक्रियेचा ताण कमी होऊन रुग्णाची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत झाली. याबाबत डॉ. राजीव मानेक म्हणाले, की गंभीर स्थूलता हे केवळ जास्त वजन नसून शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करणारा एक गंभीर आजार आहे. भारतात स्थूलतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, ही मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे. आज प्रगत सूक्ष्मछिद्र शस्त्रक्रिया आणि जलद पुनर्प्राप्ती उपचार पद्धतीमुळे आम्ही रुग्णांना सुरक्षित उपचार, कमी वेदना, जलद बरे होणे आणि दैनंदिन जीवनात लवकर परतण्यासाठी मदत करीत आहोत. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. फरझीन कुरेशी, भूलतज्ज्ञ पथक, शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचारी, प्रशासन आणि लेखा विभागाचे योगदान उल्लेखनीय ठरल्याचेही डॉ. मानेक यांनी सांगितले.

