पालिका रुग्णालयात उपचारांसाठी हेलपाटे
पालिका रुग्णालयात उपचारांसाठी हेलपाटे
मिरा-भाईंदरमध्ये डॉक्टरांची वानवा; रुग्णसेवेत अडचणी
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : महापालिकेच्या मूलभूत सुविधांपैकी आरोग्य सेवा ही एक महत्त्वाची सुविधा आहे; मात्र मिरा-भाईंदर महापालिकेची आरोग्य केंद्रे तसेच रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने सर्वसामान्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दर्जेदार आरोग्य सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. सध्या शहरात ११ आरोग्य केंद्रे, ११ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्याचप्रमाणे ३५ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू आहेत. याशिवाय मिरा रोड येथे पालिकेचे स्वतःचे रुग्णालय सुरू आहे; मात्र डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने आरोग्य केंद्रे एक दिवसाआड किंवा दोन दिवसांतून एकदाच सुरू ठेवली जात आहेत. तसेच उपलब्ध डॉक्टरांना केंद्रात आलटून पालटून किंवा विशिष्ट वेळेसाठी पाठवले जात असल्याने रुग्णालयात केवळ मर्यादित आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी करते; परंतु आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसताना ही औषधे जातात कुठे, असा सवाल माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांनी उपस्थित केला आहे.
--------------------------------------
भविष्यात गंभीर समस्या
- खासगी डॉक्टरांचे शुल्क देणे परवडत नसल्याने सर्वसामान्यांना महापालिकेची आरोग्य केंद्रे मोठा आधार ठरत असतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रांचे महत्त्व त्यांच्या दृष्टीने जास्त आहे; परंतु केंद्रांमध्ये डॉक्टरच उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे.
- आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागते; पण उपचारांचा खर्च आर्थिक भार वाढवत आहे. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट केल्या नाहीत, तर भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
-------------------------------------
डॉक्टरांची रिक्त पदे
भरली - २०२
रिक्त पदे - १४५
एकूण- ३४७
-------------------------
कार्यरत डॉक्टर - १२०
रिक्त पदे - ११०
एकूण - २३०
-----------------------------
महापालिकेला डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. रिक्त जागा भरण्यासाठी महापालिकेने भरती प्रक्रिया केली होती; मात्र त्यातील अनेक जण सेवा सोडून गेले, त्यामुळे महापालिकेकडून लवकरच भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

