पाण्यासाठी महामार्गावर आंदोलनाचा इशारा
खारघर, ता. २४ (बातमीदार) : सेक्टर ३० ते ३६ परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुढील दोन आठवड्यांत परिस्थिती सुधारली नाही, तर मुंबई-पुणे महामार्गावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून, दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने काही ठिकाणी रहिवाशांना कूपनलिकेचे पाणी वापरण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २३) माजी उपसरपंच साजिद पटेल यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर ३० ते ३६ मधील विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. गायकवाड यांची भेट घेऊन समस्येबाबत भेट घेतली. कमी दाबामुळे पाणी साठवणुकीची अडचण निर्माण होत असून, सोसायटीच्या देखभालीसाठी जमा होणारा निधी टँकरवर खर्च करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली.
रहिवाशांनी स्पष्ट केले, की सिडकोने तातडीने उपाययोजना करून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू केला नाही, तर सर्व नागरिक एकत्र येऊन सिडकोविरोधात तीव्र आंदोलन करतील आणि मुंबई-पुणे महामार्गावर उतरतील.
परिस्थिती ‘जैसे थे’
खारघर सेक्टर ३० ते ३५, तसेच तळोजा- पाचनंद परिसरातील सिडको वसाहतींमध्येही कमी दाबाने पाणीपुरवठा सुरूच आहे. यासंदर्भात नगरसेवक हरेश केणी, तुषार पाटील आणि रहिवाशांनी यापूर्वीच कार्यकारी अभियंता गायकवाड यांना निवेदन दिले होते; मात्र पंधरा दिवस उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

