नवी मुंबईत वडापाव महागला
खारघर, ता. २४ (बातमीदार) ः एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे आणि व्यावसायिक सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे नवी मुंबईत खाद्यव्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या आवडीच्या वडापाववर बसला आहे. वाढत्या खर्चामुळे वडापावचे दर वाढले असून काही ठिकाणी विक्रीही बंद ठेवावी लागत आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे; मात्र खारघर, तळोजा परिसरात काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरसाठी पाच हजारांहून अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे वडापाव, बुर्जी पाव विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वी दोन हजारांत उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरसाठी सध्या काळ्या बाजारात पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.
सध्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा अपुरा पडत असल्याने अनेक हॉटेल्स, फास्ट फूड सेंटर आणि रस्त्यावरच्या स्टॉलधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच खाद्यतेलाची भाववाढ झाल्यामुळे वडापाव १५ वरून १८ रुपये करावे लागले असून काही दिवसांत त्यात वाढ होईल, असेही काही वडापाव विक्रेत्यांनी सांगितले.
लहान व्यावसायिकांचे हाल
अधिकृत दराने सिलिंडर मिळत नसल्याने काही व्यापाऱ्यांना काळाबाजाराचा आधार घ्यावा लागत असून, एका सिलिंडरसाठी पाच हजारांहून अधिक रुपये मोजावे लागत असल्यामुळे लहान व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या परिस्थितीमुळे वडापाव, भजी, समोसा यांसारख्या पदार्थांच्या किमतीत पाच ते आठ रुपयांची वाढ झाली आहे. काही भागात वडापाव २० रुपयांपर्यंत पोहोचला असून, ग्राहकांची संख्या कमी होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कठोर कारवाईची मागणी
वाढलेल्या दरामुळे ग्राहकही नाराज असून, स्वस्त आणि झटपट मिळणारा वडापाव आता महाग झाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याची आणि काळाबाजारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

