तळा तालुक्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा
तळा तालुक्यातील पोलिस पाटलांच्या रिक्त जागा
प्रशासकीय कामांचा बोजवारा; दाखल्यांसाठी ग्रामस्थांची भरउन्हात पायपीट
तळा, ता. २४ (प्रतिनिधी) ः तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलिस पाटील पद तब्बल ४८ महसुली गावांमध्ये मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे प्रशासकीय कामांचा खोळंबा झाला असून दुर्गम भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या रिक्त जागा तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सोनसडे, कर्नाळा, फळशेत, निगुडशेत, वावेहवेली, काकडशेत, कळमशेत, बोरघरहवेली आणि अडनाळे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये पोलिस पाटील नसल्याने शासकीय कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, विवाह नोंदणी आणि वारस पंचनामा यांसाठी पोलिस पाटलाची स्वाक्षरी आणि उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, ही पदे रिक्त असल्याने साध्या सहीसाठीही ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी भरउन्हात हेलपाटे मारावे लागत आहेत. यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
केवळ दाखलेच नव्हे, तर गावात घडणाऱ्या घटनांचा पंचनामा करणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करणे ही कामेही पोलिस पाटील नसल्याने रखडली आहेत. शासनाकडून रिक्त जागा भरण्याबाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट आहे. प्रशासनाने या रिक्त जागांची भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
रिक्त पदांबाबत प्रांताधिकारी माणगाव यांनी तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून लोकसंख्येनुसार माहिती मागवली होती. ती माहिती आम्ही सादर केली आहे. पोलिस पाटील भरती प्रक्रिया शासनाकडून राबवली जाते. अधिकृत जाहीरनामा निघाल्यावर ही भरती होणे अपेक्षित आहे.
- स्वाती पाटील, तहसीलदार तळा.
तळा तालुका दुर्गम डोंगराळ आहे. अशा भागातील प्रत्येक गावात पोलिस पाटील असणे गरजेचे आहे. गेली तीन वर्षे पोलिस पाटील नसल्याने नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- परशुराम वरंडे, ग्रामस्थ सोनसडे
गाव आणि प्रशासन यामधील दुवा म्हणजे पोलिस पाटील. तोच गावात नसल्याने गावातील अनेक कामात खोळंबा होतो. अनेक बारीकसारीक कामाकडे पोलिस पाटील यांची देखरेख असते. तरी ही जागा तातडीने भरा.
- जानू अडथळे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

