देहरंग जलयोजना प्रत्यक्षात

देहरंग जलयोजना प्रत्यक्षात

Published on

पनवेल, ता. २४ (बातमीदार) : पनवेलकरांच्या वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या दिशेने पनवेल महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी ११५ कोटींची महत्त्वाकांक्षी जलयोजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत नवीन जलवाहिन्या, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आणि साठवण क्षमतेचे जलकुंभ उभारणे अशी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या मालकीचे देहरंग धरण पनवेलपासून सुमारे १६ किमीवर माथेरान डोंगराच्या पायथ्याशी आहे. या परिसरातील पावसाचे पाणी धरणात साठते. सध्या या धरणातून दररोज सुमारे १२ ते १५ एमएलडी पाणी पनवेल शहराला पुरवले जाते, मात्र शहराची पाण्याची मागणी ३० एमएलडीपेक्षा जास्त झाल्याने अतिरिक्त पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे.

२६ जुलै २००५च्या महापुरात डोंगरावरील मोठ्या प्रमाणातील माती देहरंग धरणात साचली. त्यामुळे धरण गाळाने भरले गेले आणि जलसाठा क्षमता कमी झाली. गाळ काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात अपेक्षित यश आले नाही. परिणामी धरणाची उपयुक्त क्षमता कमीच राहिली. तरीही पावसाळ्यात धरण ओसंडून वाहते आणि मोठ्या प्रमाणात पाणी गाढी नदीमार्गे खाडीत जाऊन वाया जाते.

नवीन जलवाहिन्या आणि ७० एमएलडी शुद्धीकरण केंद्र
महापालिकेच्या नव्या आराखड्यानुसार धरणाजवळ ७० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच ९.४० एमएलडी क्षमतेची साठवण टाकी उभारली जाणार आहे. यासोबत जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन आणि अधिक क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा नियोजित वापर करता येणार आहे.

सिडको वसाहतींनाही लाभ?
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर या सिडको वसाहतींनाही अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यात खारघर परिसरात भासणारी टंचाई कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

मंजुरीपूर्व हालचालींना वेग
या आराखड्याला अद्याप नगर संचालनालयाची अंतिम मंजुरी मिळालेली नसली तरी आयुक्त मंगेश चितळे यांनी मंजुरीची प्रतीक्षा न करता अंमलबजावणीसाठी प्राथमिक हालचाली सुरू केल्या आहेत. दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुढील दोन वर्षांत पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्राला हक्काचे पाणी मिळावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. राज्य सरकारने शिलार धरणाचे नियोजन केले आहे, तर सिडकोनेही स्वतंत्र रोडमॅप तयार केला आहे. अशा स्थितीत महापालिकेची ११५ कोटींची योजना महत्त्वाची ठरेल. देहरंग धरणातून पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी उचलण्यासाठी घेतलेले हे पाऊल भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आशादायी ठरेल.
- रामदास शेवाळे, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com