डहाणू तालुक्यात जलजीवन योजना अपूर्ण; पाणीटंचाईमुळे महिलांचा त्रास कायम
डहाणूतील जलजीवन योजना अपूर्ण
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट
कासा, ता. २४ (बातमीदार) : उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट जाणवते. पालघर जिल्हाही यातून सुटलेला नाही. येथील कासा, वरोती, सायवन, निंबापूर, बापूगाव, धरमपूर, मुरबाड, चळणी, दिवशी, दाभाडी, पिंपळशेत इत्यादी गावांमध्ये नागरिकांना विशेषतः महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे रखडल्याने परिस्थिती अधिकट बिकट बनली आहे.
अनेक तालुक्यांप्रमाणेच डहाणूमधील असंख्य विहिरी या कोरड्या पडल्या आहेत. त्यांची भूगर्भजल पातळी २०० ते २५० फूट खोल गेली आहे. अशात जुन्या बोअरवेलमधूनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये नागरिकांना नदीपात्रात खड्डे करून साठवलेले पाणी वापरावे लागत आहे. दरम्यान, हे साचलेले पाणी आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना साथीचा रोग होण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच शासनाने ‘हर घर नल’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी डहाणू तालुक्यातील अनेक ठिकाणी ही योजना अपूर्ण अवस्थेत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही अनेक गावांमध्ये अद्याप नळातून पाणी पोहोचलेले नाही, त्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. तालुक्यात स्वतःचे असे धामणी व कवडास धरण आहे; मात्र येथील पाणी मोठ्या प्रमाणात वसई-विरार, भाईंदर, बोईसर, तारापूर या शहरांकडे वळवले जाते; मात्र त्याच परिसरातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी विविध स्रोतांचा मार्ग अवलंबवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये त्याबाबत नाराजी आहे.
------------------
पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशन व आदिवासी उपाय योजनेंतर्गत सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. डहाणू तालुक्यात १०७ पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी अनेक योजना अर्धवट आहेत. काही ठिकाणी नळजोडणीचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे बांधकामच थांबले आहे. अनेक योजनांची प्रगती केवळ १० ते २० टक्क्यांपर्यंतच मर्यादित आहे.
अपूर्ण कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने जानेवारी २०२५ पासून ठेकेदारांवर एक टक्का दंड आकारण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामे संथ गतीने सुरू असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
-----------------
कोट :
बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जलजीवन योजनेअंतर्गत नळयोजना असूनही पाणी येत नाही. शासनाने तातडीने उपाययोजना करावी.
- अशोक भोईर, वेती ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते
-------
कोट :
डहाणू तालुक्यात १०७ जलजीवन योजना मंजूर आहेत. त्यापैकी ४० योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण, २० ‘हर घर जल’ घोषित, तर ४७ योजना प्रगतिपथावर आहेत. काही ठेकेदारांचे बिल प्रलंबित असल्याने कामे मंद गतीने सुरू आहेत. लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अस्मिता राजापुरे, पाणीपुरवठा योजना अधिकारी, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

