डोंबिवलीत नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मान
डोंबिवलीत नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मान
शहर विकासासाठी कटिबद्धतेची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिका प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने काम करणार असल्याची ग्वाही डोंबिवलीतील नवनिर्वाचित नगरसेविकांनी दिली. डोंबिवली महिला महासंघातर्फे महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात या नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी झालेल्या परिसंवादात त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. या परिसंवादात केडीएमसी क्षेत्रातील अनेक नगरसेविकांनी सहभाग घेतला होता. महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा व ज्येष्ठ सनदी लेखापाल जयश्री कर्वे यांनी नगरसेविकांशी संवाद साधत विविध नागरी प्रश्नांवर चर्चा केली.
प्रभागातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचा प्रश्न तसेच पालिकेच्या यंत्रणेत सुधारणा करण्याच्या गरजेवर नगरसेविकांनी आपली मते मांडली. लोकसहभाग वाढवून विकासकामे अधिक प्रभावीपणे राबवण्यावर त्यांनी भर दिला. महिलांना सक्षम करण्यासाठी लघुउद्योग निर्मितीला चालना देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागांमध्ये दर्जेदार रस्ते, पथदिवे, पदपथ यांसारख्या मूलभूत सुविधांसोबत स्वच्छ व सुंदर बागा, वाचनालये आणि अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान सुविधा अधिक कार्यक्षम ठेवण्यासाठीही विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात मंदा म्हात्रे, रविना माळी, अलका म्हात्रे, आर्या नाटेकर, रंजना पेणकर, ज्योती मराठे, खुशबू चौधरी, ज्योती पाटील, शारदा चौधरी, डॉ. रविना म्हात्रे, ॲड. कविता म्हात्रे, आसावरी नवरे, रसिका पाटील, मृदुला नाख्ये आदी नगरसेविकांचा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.
एकजुटीने काम करण्याचे आवाहन
कार्यक्रमाला ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी निकिता साबळे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या अध्यक्षा डॉ. विंदा भुस्कुटे होत्या. आपले शहर आदर्श बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपाध्यक्ष नेत्रा फडके यांनी केले, तर कोषाध्यक्ष सनिती रायकर यांनी आभार मानले. या वेळी रिटा ठक्कर, जोया पाटील, ॲड. तप्ती पाटील, ॲड. मनीषा तुळपुळे, संगीता देशपांडे, पूजा तोतला, ज्येष्ठ पत्रकार शरद बने, सामाजिक कार्यकर्त्या ललिता छेडा, आरती मनीश्वर, मीना गोडखिंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

