आवक घटल्याने मिरचीचा ठसका वाढणार
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : सध्या मिरचीच्या आवकेत घट झाल्याने आणि मागणी कायम असल्याने बाजारात मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सुकी मिरचीची मागणी वाढत असून पुरवठा तुलनेत कमी पडत आहे. ग्राहकांना वाढत्या दरांचा फटका बसण्याची शक्यता असून स्वयंपाकघरातील ‘मिरचीचा ठसका’ महाग होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दररोज विविध राज्यांमधून मिरचीची आवक होते. मात्र हवामानातील बदल, पिकावर झालेला परिणाम आणि गतवर्षी भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक कमी घेतल्यामुळे आवक काही प्रमाणात कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात लाल तिखट मसाला बनविला जातो. यामुळे किरकोळ, तसेच घाऊक बाजारात मिरचीचे दर वाढण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
काही व्यापाऱ्यांच्या मते, घरगुती मसाल्याला बाजारातील तयार मसाल्यांपेक्षा अधिक शुद्धता आणि चव असल्याने अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे सध्या गावोगावी आणि शहरांमध्येही मसाला बनविण्याचा हंगाम रंगात आला आहे.
सध्या महिलांची मसाला बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गुढीपाडवानंतर आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीसोबतच घराघरांत मसाला तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक चवीचा आस्वाद वर्षभर मिळावा, यासाठी महिला सध्या मसाला बनविण्यात व्यग्र झाल्या आहेत. मात्र मिरच्याचे दर हे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट वाढले आहेत.
मसाला साहित्याची खरेदी
लाल मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, हळद अशा विविध मसाल्याच्या पदार्थांची खरेदी बाजारातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागात घरगुती मसाल्याला अधिक मागणी असून, प्रत्येक घराची चव वेगळी असल्याने खास पाककलेनुसार मसाला तयार केला जातो.
मिरचीचे दर (प्रतिकिलो रुपयांत)
लवंगी २६०
बेडगी ४८०
काश्मिरी ७२०
संकेश्वरी (साधी) ३६०
संकेश्वरी (ओरिजनल) १ हजार
गत वर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक कमी घेतले. गेल्यावर्षी भाव कमी मिळाले होते. त्यात मागणी ही वाढली आहे, पण आवक कमी असल्याने दर आपसूकच वाढले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली, तर मिरचीचे दर आणखीन वाढले जातील.
- निखिल बोटे, व्यापारी, जय महाराष्ट्र मसाले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

