जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव

जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव

Published on

वाशी, ता. २४ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर १५ परिसरात असलेल्या भूखंड क्रमांक १९ वरील जुन्या व जीर्ण झालेल्या बाजाराच्या पुनर्विकासासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामुळे ऐरोली परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऐरोली सेकटर १५ मध्ये अस्तित्वात असलेला बाजार कालांतराने अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत झाला असून, कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात व्यापारी संकुल नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जागेचा सर्वांगीण पुनर्विकास करून आधुनिक, सुरक्षित व नियोजनबद्ध बाजारपेठ उभारण्याची गरज आहे. या प्रस्तावानुसार या ठिकाणी अत्याधुनिक बाजार संकुल किंवा नागरी सुविधा केंद्र उभारण्याचा विचार आहे. त्यामध्ये व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज गाळे, ग्राहकांसाठी सोयीस्कर व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, स्वच्छतागृहे, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

महापालिकेच्या नियोजनातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केल्यास परिसराचा सुयोग्य विकास साधता येईल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना स्थिर व सुरक्षित व्यवसायाचे वातावरण मिळेल, तर नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होतील. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ऐरोलीतील जीर्ण बाजाराचा कायापालट होऊन त्या ठिकाणी आधुनिक आणि सुबक बाजारपेठ उभी राहणार आहे, ज्यामुळे परिसराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल.

व्यापारी, नागरिकांचे लक्ष
महापालिकेला सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सेवा व सुविधा उभारण्याचे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी मालमत्ता संपादन करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्याच अधिकारांच्या आधारे हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, संबंधित प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाकडे स्थानिक नागरिक, व्यापारी यांच्याकडे लक्ष लागले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com