सरकारी यंत्रणांनी थकवले कोट्यावधी
सिडकोकडे ३५० कोटी थकीत
नवी मुंबई महापालिकेची सरकारी यंत्रणांकडून कोट्यवधींची थकबाकी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : नवी मुंबई महापालिकेने आर्थिक वर्षाच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीसाठी कडक पावले उचलली आहेत. सरकारी यंत्रणांकडून कोट्यवधींची थकबाकी असून, सिडको सर्वात मोठा थकबाकीदार ठरला आहे. थकबाकी वसुलीसाठी जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत सुमारे साडेतीन लाख मालमत्ता आहेत. यापैकी सुमारे दीड लाख रहिवासी मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. या थकबाकीदारांवर महापालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. विशेषतः ५० लाखांहून अधिक कर थकवणाऱ्या मालमत्तांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
सानपाडा परिसरातील भूमिराज विकसकाने सुमारे ८० लाख रुपये थकवले होते. वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे सोमवारी (ता. २३) महापालिकेने संबंधित इमारतीतील कार्यालयाला सील ठोकले. या कारवाईनंतर विकसकाने तातडीने थकीत रक्कम अदा केली.
दरम्यान, सरकारी यंत्रणांकडूनही मोठ्या प्रमाणावर कर थकबाकी आहे. सिडको, एमटीएनएल, महावितरण, रेल्वे प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पोस्ट कार्यालय यांनी मिळून सुमारे ४०० कोटी रुपयांची थकबाकी ठेवली आहे. या रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेने संबंधित संस्थांना नोटिसा बजावल्या असून, काही प्रकरणे न्यायालयातही प्रलंबित आहेत.
– – – –
थकबाकीची रक्कम :
सिडको - ३५० कोटी
महावितरण - २३ कोटी
एमटीएनएल - सहा कोटी
रेल्वे - एक कोटी ७७ लाख
पोस्ट कार्यालय - एक कोटी २३ लाख
एमजेपी - १२ लाख
– – – –
३,६४२ थकबाकीदारांना नोटिसा
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने तीन हजार ६४२ थकबाकीदारांना ४८ तास ते सात दिवसांची नोटीस दिली आहे. नोटीस देऊनही कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जप्ती व लिलावाची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने कर भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

