पालिकेतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे
पालिकेतील सफाई कामगारांना हक्कांची घरे
मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला दिले. या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या घनकचरा खात्यामध्ये सफाई कामगारांना शासनाने हक्काची घरे द्यावीत, या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला होता; मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करीत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला हक्काची घरे देण्याचे आश्वासन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे कामगार नेते अशोक जाधव यांनी सांगितले. मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून, सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव, यशवंत देसाई, अरुण नाईक आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

