रिक्त पदांमुळे पोषण योजना संकटात
रिक्त पदांमुळे पोषण योजना संकटात
अंगणवाडी सेविका ८१, पर्यवेक्षिका ४२ तर प्रकल्प अधिकारी १० रिक्त जागा; काही प्रकल्पांमध्ये मोठी तूट कायम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पर्यवेक्षिका पदांची फेब्रुवारी २०२६ अखेरची स्थिती समोर आली असून, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या एकूण ८१, पर्यवेक्षिका पदाच्या एकूण ४२ तर प्रकल्प अधिकारी पदाच्या एकूण १० जागा अद्याप रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बालविकास सेवा व पोषण योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) पदांची एकूण १६ मंजूर पदे असून, त्यापैकी सहा भरलेली तर १० पदे रिक्त आहेत. पर्यवेक्षिका १०६ मंजूर पदांपैकी ६४ भरलेली असून, ४२ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अंगणवाडी केंद्रांच्या देखरेख व मार्गदर्शनात अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत जिल्ह्यात एकूण ३,१६९ मंजूर पदे असून, त्यापैकी ३,०८० पदे भरलेली आहेत, तर ८१ पदे रिक्त आहेत. विशेषतः काही तालुक्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण जास्त असल्याने बालकांना मिळणाऱ्या पोषण आहार व शैक्षणिक सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाड आणि माणगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी आठ सेविका पदे रिक्त आहेत. पोलादपूरमध्ये १२, श्रीवर्धनमध्ये १४ तर पेणमध्ये सात रिक्त पदे आहेत. मुरूड, तळा, सुधागड आणि उरण या तालुक्यांमध्येही काही प्रमाणात रिक्त पदे दिसून येत आहेत. याउलट रोहा तालुक्यात सर्व पदे भरलेली असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
चौकट
सेवा वितरणावर परिणाम
अंगणवाडी केंद्रे ही बालकांच्या पोषण, आरोग्य तपासणी आणि पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी महत्त्वाची कडी आहे. मात्र सेविका व पर्यवेक्षिका पदांतील तुटवड्यामुळे या सेवांचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. अनेक केंद्रांमध्ये अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवरही दबाव निर्माण होत आहे. अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामधून भरतीची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यातील नागरिक व स्थानिक प्रतिनिधींनी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. महिला व बालविकास विभागाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवून ही पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकंदरीत रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी व्यवस्थेत मनुष्यबळाची कमतरता स्पष्टपणे जाणवत असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
ज्यांनी १० ते २५ वर्षे सेविका म्हणून काम केले असून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेऊन आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावत तुटपुंजा मानधनावर सेवा केली आहे, अशा कित्येक अंगणवाडी सेविका अंतर्गत भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना या अंतर्गत भरतीमुळे न्याय मिळण्याची शक्यता आहे. कारण गेल्या १५ वर्षांपासून अंतर्गत भरती झाली नसून, ही भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी.
- जीविता पाटील, अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटना जिल्हा प्रतिनिधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

