

जनगणनेमध्ये भटक्यांसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : जनगणना २०२७मध्ये भटक्यांसाठी स्वतंत्र रकाना आणि राष्ट्रीय आयोगाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी मंगळवारी (ता. २४) मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि जनगणना २०२७ संदर्भात ठोस धोरण निश्चित करण्यासाठी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील विविध संघटनांच्या नेत्यांची विशेष बैठक नुकतीच भांडुप येथे पार पडली. या वेळी भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण गायकवाड, समाजसेवक ॲड. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्त्या बायजाबाई घोडे आदी उपस्थित होते. या वेळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. जनगणना २०२७ मध्ये स्वतंत्र रकाना, जनगणनेच्या घर सूचीकरण प्रक्रियेत (मुद्दा क्रमांक १२) सध्या केवळ एससी, एसटी आणि इतर असेच पर्याय आहेत. भटके विमुक्त समाजाची नोंद ‘इतर’ वर्गात होत असल्याने त्यांची नेमकी लोकसंख्या आणि दयनीय अवस्था समोर येत नाही. त्यामुळे जनगणनेच्या दोन्ही टप्प्यांत ‘भटके विमुक्त’ असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच संसदेत मांडण्यात आलेल्या भटके विमुक्त आणि निमभटके जमातींसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक, २०२६ला तत्काळ मंजुरी देऊन या समाजाला स्वतंत्र घटनात्मक आणि वैधानिक मान्यता द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.