

कोकण रहिवासी मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) ः इंदिरानगर परिसरातील एकवीरा सोसायटीत कोकण रहिवासी मंडळाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. सुबक सजावट आणि पारंपरिक वेशभूषेमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत परब (बुवा) आणि उपाध्यक्ष शंकर पेंडुरकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अत्यल्प सदस्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका सक्षम आणि विश्वासार्ह संस्थेपर्यंत पोहोचला असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. केवळ उत्सव साजरा न करता, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान, रक्तदान शिबिरे आणि गरजूंना धान्यवाटप, ज्येष्ठ नागरिकांचा गौरव आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन, संकटाच्या काळात नागरिकांना तत्पर मदतीचा हात आदी उपक्रम मंडळाने राबवले आहेत. एकजुटीच्या जोरावर आणि संस्कृती जपण्याच्या ध्यासातून हे कार्य उभे राहिले आहे. समाजाची सेवा करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मंडळाचे पदाधिकारी सांगतात.
प्रकाश चौगुले आणि राजेंद्र पिंपुटकर यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. मनाली शिंदे यांनी काढलेली आकर्षक रांगोळी उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरली. स्थानिक नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा वाढली.