विक्रमगडमध्ये ‘प्रथम’चा प्रेरणादायी मेळावा उत्साहात

विक्रमगडमध्ये ‘प्रथम’चा प्रेरणादायी मेळावा उत्साहात
Published on

‘प्रथम’च्या उपक्रमामुळे महिलांच्या जीवनात आशादायी बदल

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : प्रथम संस्था आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमामुळे विक्रमगड तालुक्यातील महिलांच्या जीवनात आशादायी बदल घडताना दिसत आहेत. या उपक्रमांतर्गत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या महिलांना मोफत व सुलभ शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.
केवळ शैक्षणिक पात्रता वाढवणे इतकाच या उपक्रमाचा उद्देश नसून, महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगारक्षम करणे हादेखील महत्त्वाचा हेतू आहे. शिक्षणामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम होत आहेत. या प्रेरणादायी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी विक्रमगड येथे ‘झलक अ‍ॅक्टिव्हिटी’ तसेच माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थिनी, प्रशिक्षणार्थी महिला, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मागील तीन वर्षांत तब्बल ३५३ महिलांनी दहावी उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर महिलांच्या आयुष्यात आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. अनेक महिला विविध क्षेत्रांत रोजगार मिळवून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उभारणीत मोलाची भूमिका बजावत असून, काही महिलांनी स्वयंरोजगाराचे मार्ग स्वीकारत लघुउद्योग सुरू केल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
मेळाव्यात विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी महिलांना मार्गदर्शन केले. वृत्ती फाउंडेशन, हकदर्शक, केशवसृष्टी, वारली पेंटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच चाइल्ड हेल्प फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी महिलांना विविध रोजगार आणि व्यवसाय संधींबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व पूरक व्यवसाय, बांबू उद्योगातील वाढत्या संधी, शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा तसेच पारंपरिक वारली कलेद्वारे घरबसल्या उत्पन्न कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तहसीलदार सुजाता वायाळ, आयसीडीसी प्रतिनिधी कल्पना राऊत, ‘प्रथम’चे कार्यक्रम समन्वयक हरीश खोब्रागडे, एल अँड टी पीसीटीचे प्रतिनिधी अक्षय कातड, ‘प्रथम’चे प्रतिनिधी सोमनाथ गायकवाड व विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com