

जुईनगर रेल्वे फाटकावर पूल उभारण्याची मागणी
जुईनगर, ता. २५ (बातमीदार) : जुईनगर येथील रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक नगरसेवक विशाल ससाणे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे रुळांना समांतर जाणारा हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होते. शिवाय मुंबई बाजार समितीमधील घाऊक बाजारांमध्ये जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने वाहतुकीचा ताण अधिक वाढतो. जुईनगर परिसरातील नागरिकांना रेल्वे फाटकामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे गाड्या ये-जा करत असताना फाटक दीर्घकाळ बंद राहिल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा मोठा खोळंबा होतो. अनेकदा घाईत फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करताना अपघातही घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी येथे पूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे विशाल ससाणे यांनी सांगितले.
तसेच, जुईनगर रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचेल आणि अपघातांचे प्रमाणही घटेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाने या प्रस्तावाची दखल घेत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे जुईनगर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची शक्यता आहे.
ठेकेदार निवडीबाबतही सूचना
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवेळी ठेकेदार निवडीबाबतही ससाणे यांनी सूचना केली. काळ्या यादीतील (ब्लॅकलिस्ट) ठेकेदारांना काम देऊ नये, अन्यथा कामाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. शिवाय निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे गंभीर दुर्घटना घडू शकते असे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनेच काम देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.