

राज्य महामार्गावर अपघातांचे सत्र
डहाणू-चारोटीदरम्यान रस्तेदुरुस्तीची गरज
कासा, ता. २५ (बातमीदार)ः डहाणू-नाशिक राज्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे डहाणू ते चारोटीदरम्यान रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी मोऱ्या बांधण्याचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर गेल्या दोन दिवसांत दोन गंभीर अपघात घडले. रानशेत येथील पुलाचा कठडा तोडून एक ट्रक नदीत कोसळला. तर बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास सारणी येथील धोकादायक वळणावर मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडाला धडकला. विशेष म्हणजे महामार्गावरील खड्डे, उखडलेले भाग, पडलेल्या सूचनाफलकांमुळे वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्तेदुरुस्तीसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------------------------
अपघातांचा धोका
- महालक्ष्मी देवीची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेनिमित्त डहाणूसह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक, प्रवासी वाहने, दुचाकी आणि एसटी बस या मार्गावरून ये-जा करतात. दरम्यान, रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे.
- यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर मोठ्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
----------------------------------------
डहाणू-चारोटी मार्गावर अर्धवट कामामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघात घडत आहेत. महालक्ष्मी यात्रेमुळे भाविकांची मोठी गर्दी होणार असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
- प्रणय मेहेर, उपसरपंच, चारोटी