

‘आदरातिथ्या’त अडचणी
व्यावसायिक गॅसचा १० टक्केच पुरवठा; हॉटेल व्यवसाय अडचणीत
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २५ ः व्यावसायिक गॅसच्या पुरवठा साखळीतील अडथळे, वितरणातील असमतोल आणि साठेबाजीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रत्यक्ष मागणी तीन हजार सिलिंडरची असताना फक्त ३४० व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे आदरातिथ्य करणे हॉटेल व्यावसायिकांसाठी अडचणीचे झाले आहे.
दररोज ग्राहकांची मागणी पूर्ण करायची, पण गॅसच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत व्यवसाय सुरू ठेवायचा कसा, असा सवाल हॉटेल व्यावसायिक उपस्थित करीत आहेत. काहींना तर गॅसपुरवठा होत नसल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ ओढवली आहे. एकीकडे गॅसअभावी व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले आहे. तर दुसरीकडे मार्चअखेर परवाना नूतनीकरणाचे संकट गडद आहे. व्यावसायिक गॅसटंचाई केवळ पुरवठ्याची समस्या नसून, संपूर्ण खाद्य व्यवसाय साखळीवर परिणाम करणारे गंभीर आर्थिक संकट बनत आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर याचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
------------------------
अर्थव्यवस्था डळमळीत
- जिल्ह्यात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे हॉटेल, उपाहारगृह, खाणावळी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसमोर गंभीर संकट आहे. गॅसअभावी अनेक हॉटेलांना व्यवसाय कमी क्षमतेने चालवावा लागत आहे. काही ठिकाणी काही तासच हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.
- पालघर पर्यटन जिल्हा आहे. गॅसटंचाईने हॉटेल, गेस्ट हाउस, निसर्ग आणि कृषी पर्यटन केंद्रे, लॉज, भाड्याचे बंगले, रिसॉर्टसच्या स्वयंपाकघरावर मर्यादा आल्याने पर्यटक पाठ फिरवत असल्याने व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत असून, अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.
- पालघर जिल्ह्यात खाणावळी, घरगुती उपाहारगृह सोडली तर बहुतांश हॉटेलमध्ये परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कामगार गावी जाण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
------------------------------
नाश्ता, जेवणाची दरवाढ
एलपीजीला पर्याय असलेल्या इंधनाचाही खर्च वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करावी लागत आहे. परिणामी, ग्राहकांनाही थेट आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी नाश्ता, जेवणाच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. पर्यायी इंधन साधनांचा वापर केल्याने खर्च वाढत असून, अन्नपदार्थांची चव आणि गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. तर हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांचे हाल होत आहेत.
----------------------------
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने गॅसपुरवठा वाढवावा. वितरण व्यवस्था पारदर्शक करावी. गॅसपुरवठा झाला नाही तर येत्या काही दिवसांत पर्यटन नगरीतील हजारो कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल.
- नितांत चव्हाण, अध्यक्ष, पालघर हॉटेल असोसिएशन
----------------------------------
जिल्ह्यातील व्यावसायिक गॅसपुरवठा
पुरवठा कंपनी - ग्राहक दररोज गरज पुरवठा (आवक)
भारत गॅस - १८,४६४ २,६६३ २००
एचपी - ७,६८२ ६९१ १००
इंडियन ऑइल - २,९३२ २८१ ४०
एकूण - २९,०७८ ३,०३५ ३४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.