

महावितरण कार्यालय स्थलांतरामुळे श्रीवर्धनकरांची गैरसोय
केंद्रापासून दूर ठिकाण; ग्राहकांचा वाढला प्रवासाचा खर्च
श्रीवर्धन, ता. २५ (वार्ताहर) : शहरातील बस स्थानकासमोर अनेक वर्षे कार्यरत असलेले महावितरण कार्यालय काही वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. मात्र नवीन ठिकाण हे मध्यवर्ती भागापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी बस स्थानक व मिनीडोअर थांब्यांच्या जवळ कार्यालय असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना वीजबिल भरणे व इतर कामे करणे सोपे होते. मात्र हे कार्यालय खेर्डी-आराठी परिसरात हलवल्यानंतर विशेषतः खेड्यातील ग्राहकांसाठी प्रवास खर्चीक व वेळखाऊ ठरू लागला आहे.
कार्यालयाजवळ थेट बससेवा नसल्याने ग्राहकांना रिक्षावर अवलंबून राहावे लागत असून, वाढत्या भाड्यामुळे आर्थिक ताण वाढत आहे. त्यामुळे बस स्थानकाजवळ किंवा प्रशासकीय इमारती परिसरात महावितरणने वीजबिल भरणा केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
चौकट
तक्रार नोंदवणे अशक्य
महावितरणचा वीजबिल भरणा श्रीवर्धन येथील एका खासगी बॅंकेत करता येतो. परंतु चुकीचे वीजबिल येणे, मीटरमध्ये बिघाड असणे किंवा वारंवार वीजपुरवठा खंडित होणे याकरिता लेखी तक्रार करणे आवश्यक असते. मध्यवर्ती भागात केंद्र सुरू करून तिथेच तक्रारवही ठेवल्यास शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांना त्याचा फायदा होईल. कार्यालयात वीजबिलाशी संबंधित, नवीन वीजजोडणी किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी महावितरणची ऑनलाइन कार्यप्रणाली उपलब्ध आहे. यामध्ये महावितरण मोबाईल ॲप, ऑनलाइन वीजबिल भरणा, ई-मेल स्वरूपात ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. परंतु अनेक ग्राहकांकडे अद्यापही साध्या पद्धतीचे भ्रमणध्वनी असल्याने ऑनलाइन कार्यप्रणालीचा ग्राहकांना काही फायदा होत नाही.
प्रतिक्रिया
कार्यालय स्वतःच्या मालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. विद्युत देयक भरणा एका खासगी पतपेढीत करता येतो. ग्राहकांनी मागणी केल्यास श्रीवर्धन येथे वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात येईल. या अनुषंगाने तक्रार नोंदणी ही केंद्रात करता येईल.
- विजयकुमार जयराम बोरसे, श्रीवर्धन उपविभाग, उप कार्यकारी अभियंता, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.