राज्यातील नव्या क्षय रुग्णसंख्येत घट

राज्यातील नव्या क्षय रुग्णसंख्येत घट
Published on

नव्या क्षय रुग्णसंख्येत घट
राज्यभरात चाचण्यांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यात क्षयरोग (टीबी) नियंत्रणाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. गेल्या काही वर्षांत तपासणी (स्क्रीनिंग) मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असतानाही नव्या क्षयरुग्णांच्या संख्येत सुमारे पाच टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हा कल कायम राहिला तर राज्यासाठी ही मोठी आरोग्यदृष्ट्या यशस्वी बाब ठरणार आहे. केंद्र सरकारच्या टीबीमुक्त भारत अभियानाअंतर्गत राज्यात व्यापक पातळीवर स्क्रीनिंग मोहीम राबवली जात आहे. संशयित रुग्णांची लवकर ओळख करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२१ ते २०२५ या कालावधीत क्षय तपासणीमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. २०२४मध्ये ३५,३९,९४१ लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २,३०,५१५ (६.५१ टक्के) रुग्णांमध्ये क्षयाचे निदान झाले. तर २०२५मध्ये तपासणीचा आकडा ४५,७१,९३४ पर्यंत वाढला, मात्र त्यापैकी २,१७,२९९ (४.७५ टक्के) रुग्णांमध्येच आजार आढळला. तपासणी वाढूनही बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येते.

संसर्गाची साखळी विस्कळित
राज्य क्षय व कुष्ठरोग नियंत्रण विभागाचे संयुक्त संचालक डॉ. राजरत्न वाघमारे यांनी सांगितले, की क्षय रुग्णसंख्येत होत असलेली घट ही सकारात्मक बाब आहे. आम्ही स्क्रीनिंग आणि चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे आधी निदर्शनास न आलेले रुग्ण आता समोर येत आहेत. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने संसर्गाची साखळी तुटत आहे.

क्षयमुक्त राज्य
तज्ज्ञांच्या मते, लवकर निदान, नियमित औषधोपचार आणि जनजागृती या त्रिसूत्रीमुळे क्षय नियंत्रण शक्य होत आहे. याशिवाय पोषण सहाय्य योजना, मोफत औषधे आणि डिजिटल ट्रॅकिंग यंत्रणेमुळे रुग्ण उपचार पूर्ण करीत असल्याचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य विभागाने पुढील काळातही स्क्रीनिंग मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, २०२५ पर्यंत क्षयमुक्त राज्य हे उद्दिष्ट गाठण्यावर भर दिला जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com