चिकन विक्रेत्यावर केडीएमसीची कारवाई

चिकन विक्रेत्यावर केडीएमसीची कारवाई
Published on

चिकन विक्रेत्याला पाच हजारांचा दंड

डोंबिवली, ता. २५ : स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून नाल्यात कोंबडीची पिसे आणि टाकाऊ मांस टाकणाऱ्या एका चिकन विक्रेत्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेने कारवाई केली आहे. या बेजबाबदार कृत्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित विक्रेत्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर परिसरात एक चिकन विक्रेता आपल्या दुकानातील टाकाऊ कचरा, कोंबडीची पिसे आणि मांसाचे तुकडे थेट जवळच्या नाल्यात फेकत होता. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. स्थानिक नागरिकांनी या घाणीबाबत वारंवार संताप व्यक्त केला होता.


व्हिडिओ व्हायरल होताच केडीएमसीच्या आरोग्य विभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथक रवाना केले. प्रत्यक्ष पाहणीत दोषी आढळल्याने संबंधित विक्रेत्याकडून जागीच पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहराचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी किंवा नाल्यांत कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

व्यावसायिकांचे धाबे दणाणले
कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळण्याबाबत इतर व्यावसायिकांनाही कडक इशारा मिळाला आहे. प्रशासनाने अशीच सतर्कता कायम ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com